७४२ शाळांच्या शिक्षक मान्यता-सेवासातत्याची एसआयटीकडून चौकशी
१६ ते १८ सप्टेंबरदरम्यान कागदपत्रे सादर करण्याचे आदेश; दिरंगाई केल्यास शाळा व्यवस्थापन व मुख्याध्यापक जबाबदार

छत्रपती संभाजीनगर 16 सप्टेंबर 26 ( प्रतिनिधी ) : जिल्ह्यातील शिक्षकांच्या नियुक्त्या, वैयक्तिक मान्यता आणि सेवासातत्याशी संबंधित कागदपत्रांची विशेष चौकशी पथक अर्थात एसआयटीकडून तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील तब्बल ७४२ शाळांनी शिक्षकांच्या मान्यता व सेवासातत्याशी संबंधित सर्व आवश्यक कागदपत्रे १६ ते १८ सप्टेंबरदरम्यान सादर करावीत, असे आदेश जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी संघरत्न सरोदे यांनी शाळांचे अध्यक्ष, सचिव तसेच मुख्याध्यापकांना दिले आहेत.
या चौकशीसाठी पदमपुरा येथील महात्मा फुले प्राथमिक शाळेत सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत. विशेष म्हणजे, कोणतेही कारण न देता निर्धारित वेळेत कागदपत्रे सादर करण्याचे स्पष्ट निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत.
२०१६ ते २०१९ मध्ये रुजू झालेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी
गत आठवड्यात एसआयटीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ आयडीशी संबंधित तब्बल १० हजार ४९ संचिकांची तपासणी केली होती. आता एसआयटीचे पथक पुन्हा जिल्ह्यात येणार असून, २०१६ ते २०१९ या कालावधीत सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची सखोल तपासणी केली जाणार आहे.
शिक्षकांच्या नियुक्ती प्रक्रियेतील मान्यता, सेवासातत्य आणि संबंधित कागदपत्रांची पडताळणी या माध्यमातून केली जाणार असल्याने शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापकांसाठी ही चौकशी महत्त्वाची ठरणार आहे.
तीन दिवसांत क्रमांकानुसार कागदपत्रांची तपासणी
एसआयटीच्या तपासणीसाठी ७४२ शाळांची कागदपत्रे तीन दिवसांत क्रमांकानुसार स्वीकारली जाणार आहेत. त्यानुसार—
१६ सप्टेंबर : यादीतील अनुक्रमांक १ ते २००
१७ सप्टेंबर : अनुक्रमांक २०१ ते ४००
१८ सप्टेंबर : अनुक्रमांक ४०१ ते ७४२
या क्रमाने संबंधित शिक्षकांची कागदपत्रे तपासणीसाठी सादर करावी लागणार आहेत.
प्रत्येक पानावर स्वाक्षरी आणि पृष्ठ क्रमांक बंधनकारक
कागदपत्रांचा प्रस्ताव सादर करताना शिक्षण विभागाने काही नियमही निश्चित केले आहेत. प्रस्तावातील प्रत्येक पानावर शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापकांची स्वाक्षरी तसेच पृष्ठ क्रमांक असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
तसेच प्रस्तावासोबत मागासवर्ग कक्षाकडून प्रमाणित जाहिरात आणि बिंदुनामावली जोडणे आवश्यक आहे. त्यामुळे कागदपत्रांची पूर्तता करताना कोणतीही त्रुटी राहू नये, याची दक्षता घेण्याच्या सूचना शाळा व्यवस्थापनाला देण्यात आल्या आहेत.
दिरंगाई झाल्यास जबाबदारी निश्चित
निर्धारित वेळेत आवश्यक कागदपत्रे सादर न झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापकांवर निश्चित केली जाईल, असा स्पष्ट इशारा शिक्षण विभागाने दिला आहे. त्यामुळे कागदपत्रे जमा करण्यास दिरंगाई करू नये आणि दिलेल्या वेळापत्रकानुसार सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
एसआयटीच्या या तपासणीमुळे २०१६ ते २०१९ या कालावधीत झालेल्या शिक्षक नियुक्त्या, त्यांना देण्यात आलेल्या वैयक्तिक मान्यता तसेच शालार्थ आयडी आणि सेवासातत्याशी संबंधित नोंदींची पडताळणी होणार असल्याने शिक्षण क्षेत्राचे या चौकडीकडे लक्ष लागले आहे.





