विधान परिषद निवडणुकीचे बिगुल; काँग्रेसकडून तीन उमेदवार जाहीर
नागपूर पदवीधरमधून अभिजित वंजारी, पुणे शिक्षकमधून जयंत आसगावकर यांना पुन्हा संधी; अमरावतीत प्रा. अदिती पोहरे मैदानात

मुंबई ३ ऑक्टोबर २६: महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला वेग दिला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या तीन उमेदवारांची अधिकृत घोषणा करत निवडणुकीच्या तयारीत आघाडी घेतली आहे.
काँग्रेसच्या घोषणेनुसार नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून अभिजित गोविंदराव वंजारी, पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून जयंत दिनकर आसगावकर आणि अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून प्रा. अदिती ऋषिकेश पोहरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वंजारी आणि आसगावकर हे विद्यमान आमदार असून त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
काँग्रेसच्या या घोषणेमुळे नागपूर आणि पुणे मतदारसंघातील उमेदवारीबाबतचा संभ्रम दूर झाला आहे. दुसरीकडे अमरावती शिक्षक मतदारसंघातून प्रा. अदिती पोहरे यांच्या नावाचीही अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
पाच मतदारसंघांत रंगणार निवडणूक
यंदा विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक होत आहे. औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), पुणे आणि नागपूर हे पदवीधर, तर अमरावती आणि पुणे हे शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहेत. विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ ६ डिसेंबर २०२६ रोजी संपणार आहे.
काँग्रेसने उमेदवारांची घोषणा केल्यानंतर आता इतर प्रमुख राजकीय पक्षांकडून कोणाला मैदानात उतरवले जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विशेषतः पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने पुढील काही दिवसांत राजकीय हालचालींना आणखी वेग येण्याची शक्यता आहे.
निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक
अधिसूचना : २९ सप्टेंबर २०२६
उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख : ६ ऑक्टोबर २०२६
अर्जांची छाननी : ७ ऑक्टोबर २०२६
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : ९ ऑक्टोबर २०२६
मतदान : २३ ऑक्टोबर २०२६, सकाळी ८ ते दुपारी ४
मतमोजणी व निकाल : २७ ऑक्टोबर २०२६
निवडणूक प्रक्रिया पूर्ण : ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत
आता काँग्रेसनंतर इतर पक्षांच्या उमेदवारांच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले असून, उमेदवारी अर्ज दाखल होण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी या पाचही मतदारसंघांतील राजकीय चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.




