गोंदियामहाराष्ट्रवृत्तविशेष

संपूर्ण गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी आमदार विनोद अग्रवाल आज मंत्रालयात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मांडणार वस्तुस्थिती

गोंदिया, २९ सप्टेंबर प्रतिनिधी ( चंद्रकुमार सहारे ) : बदलते हवामान आणि पुरेशा पावसाअभावी गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पावसाच्या कमतरतेचा धान पिकांवर प्रतिकूल परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आमदार विनोद अग्रवाल यांनी पुढाकार घेतला आहे.

आमदार विनोद अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून गोंदिया जिल्ह्यातील सद्यस्थितीची माहिती दिली. जिल्ह्यातील पावसाची कमतरता आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पीक परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया, देवरी, आमगाव, सालेकसा, अर्जुनी-मोरगाव आणि सडक-अर्जुनी या सर्व तहसीलमधील पावसाअभावी प्रभावित झालेल्या पिकांचे तातडीने सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी आमदार अग्रवाल यांनी केली आहे. तसेच सर्व प्रभावित क्षेत्रांचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन संपूर्ण गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

धान उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत असल्याचे आमदार अग्रवाल यांनी म्हटले आहे. केवळ एका तहसीलचा विचार करून इतर प्रभावित भागांकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.

दरम्यान, २९ सप्टेंबर रोजी मुंबई येथील मंत्रालयात आमदार विनोद अग्रवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. यावेळी गोंदिया जिल्ह्यातील पीक परिस्थितीची वस्तुस्थिती सरकारसमोर मांडून संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी करणारे निवेदन साद करण्यात येणार आहे.

पावसाअभावी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार आवश्यक मदत व दिलासा मिळावा, तसेच प्रभावित पिकांचे तातडीने सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळावी, अशी मागणीही यावेळी करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button