शेंड्यात अवैध रेती वाहतुकीला महसूल विभागाचा दणका; दोन ट्रॅक्टर जप्त
विना नंबरचे दोन ट्रॅक्टर रेतीसह ताब्यात

सडक अर्जुनी ५ ऑक्टोबर २६ ( निलेश शहारे ) : तालुक्यातील मौजा शेंडा येथे अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरोधात महसूल विभागाने सोमवारी (५) पहाटे धडक कारवाई केली. पहाटे साडेपाचच्या सुमारास रेती भरून वाहतूक करणारे विना नंबरचे दोन ट्रॅक्टर महसूल पथकाने ताब्यात घेतले.
ही कारवाई तहसीलदार इंद्रायणी गोमासे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. ताब्यात घेण्यात आलेले ट्रॅक्टर विशाल विजय रामरामे व दिनेश हेमराज भोंडे (रा. शेंडा) यांच्या मालकीचे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. दोन्ही ट्रॅक्टर पुढील कार्यवाहीसाठी तहसील कार्यालय, सडक अर्जुनी येथे जमा करण्यात आले.
कारवाईत ग्राम महसूल अधिकारी लिलाधर कापगते, हर्षकुमार उईके, एम. ए. कुरैशी, चेतन पुराम व मयुर थोरवे सहभागी होते. महसूल विभागाच्या या कारवाईमुळे अवैध रेती उत्खनन व वाहतुकीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कारवाई तीव्र केल्याचे दिसून येत आहे.





