गोंदियामहाराष्ट्रवृत्तविशेष

परतीच्या पावसाचे संकेत; महाराष्ट्रात आज वादळी पावसाचा यलो अलर्ट

नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू; अंदमानातील हवामान प्रणाली सक्रिय होण्याची शक्यता

सडक अर्जुनी 20 सप्टेंबर  2026 प्रतिनिधी :  नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा देशातून परतीचा प्रवास शनिवारी पश्चिम राजस्थानमधून सुरू झाला आहे. यंदा मान्सूनची माघार दोन दिवस उशिराने सुरू झाली असून, पुढील तीन ते चार दिवसांत पंजाब आणि गुजरातच्या काही भागांतूनही मान्सून माघार घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून, ही हवामान प्रणाली आगामी काळात अधिक तीव्र होण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, अंदमान समुद्रातील प्रणाली २३ सप्टेंबरपर्यंत तीव्र होऊन ओडिशा-आंध्र प्रदेश किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्षिण भारतासह पूर्व किनारपट्टीवरील काही भागांत २५ सप्टेंबरपर्यंत पावसाची स्थिती राहण्याचा अंदाज आहे. ओडिशा आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीला २१ ते २४ सप्टेंबरदरम्यान मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, पश्चिम बंगाल तसेच ईशान्येकडील काही राज्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता

महाराष्ट्रातही रविवारी अनेक भागांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असून ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. त्यामुळे पावसाची दीर्घ प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगरात पावसाच्या दडीमुळे उकाडा वाढला

छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने ओढ दिल्याने सप्टेंबरमध्ये उकाडा वाढला आहे. १९ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सरासरी ५२६.६ मिमी पावसाची अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात ४२२.० मिमी म्हणजेच ८०.२ टक्के पाऊस नोंदविण्यात आला आहे.

जून ते ऑगस्टदरम्यान ९०.८ टक्के पाऊस झाला असला तरी सप्टेंबरमध्ये पावसाने दडी मारल्याने वातावरणातील आर्द्रता कमी झाली आहे. परिणामी उकाड्यात वाढ झाली असून, सलग सहाव्या दिवशी शहराचे कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसच्या पुढे राहिले.

‘एल निनो’चा परिणाम; थंडीही कमी राहण्याचा अंदाज

एमजीएम विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांच्या मते, वाढत्या एल निनोच्या प्रभावामुळे हवामानात बदल जाणवत आहेत. मराठवाड्यात यंदा परतीचा पाऊस तुलनेने कमी राहण्याची शक्यता असून आगामी हिवाळ्यात थंडीचा कडाकाही कमी राहण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

जालन्यात सोमवारपासून पाच दिवस पावसाची शक्यता

जालना जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून असलेली पावसाची उघडीप आता संपण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सोमवारपासून शुक्रवारपर्यंत जिल्ह्यात पावसाची शक्यता असून काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार सरी कोसळू शकतात.

या काळात बहुतांश वेळ ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून कमाल तापमानातही घट होऊ शकते. मागील आठवड्यात जिल्ह्यात दोन वेळा तुरळक पाऊस झाला; मात्र त्याचा फारसा परिणाम जाणवला नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांचे लक्ष पुढील पाच दिवसांच्या हवामानाकडे लागले आहे. सध्या जिल्ह्यात कमाल तापमान सुमारे ३२.७ अंश सेल्सिअस आहे.

‘पुढील दोन-तीन दिवस महत्त्वाचे’

हवामान अभ्यासक प्रा. पंडित वासरे यांच्या मते, वातावरणात सध्या उकाडा वाढत असला तरी पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. पुढील दोन-तीन दिवसांत पाऊस होण्याची शक्यता असून त्यानंतर सप्टेंबरच्या अखेरीस परतीच्या पावसाचीही अपेक्षा आहे. खरीप पिकांसाठी हा पाऊस महत्त्वाचा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सोलापुरात रात्री हलक्या सरी

हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ दिल्यानंतर शनिवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास जुळे सोलापूर, विजापूर रोड ते सातरस्ता परिसरात हलक्या सरी कोसळल्या. शहरातील इतर भागांत मात्र पाऊस झाला नाही.

दिवसभर चटके देणारे ऊन आणि सायंकाळी जाणवणाऱ्या उकाड्यानंतर रात्री अचानक हलक्या सरी बरसल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. गणेशोत्सवाच्या काळात परतीच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती; मात्र आतापर्यंत पावसाचा फारसा मागमूस नव्हता. शनिवारी काही भागांत झालेल्या पावसामुळे आगामी दिवसांत पावसाची स्थिती सुधारण्याची आशा निर्माण झाली आहे.

आता लक्ष परतीच्या पावसाकडे

मान्सूनच्या परतीला सुरुवात झाल्यानंतर महाराष्ट्रातही वातावरणात बदल जाणवू लागले आहेत. अंदमान समुद्रातील हवामान प्रणाली आणि आगामी दिवसांतील पावसाची शक्यता पाहता, खरीप हंगामासाठी पुढील काही दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button