अनिल बिसेन यांच्या अपात्रतेनंतर देवरी पंचायत समितीतील ५५ ग्रामपंचायतींच्या चौकशीचे आदेश ; शासनाचे पत्र धडकले!
आमदार रोहित पवार यांच्या निवेदनाची विभागीय आयुक्तांकडून दखल; जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

गोंदिया/देवरी 10 नोव्हेंबर प्रतिनिधी ( पालकराम वालदे ) : देवरी पंचायत समितीचे माजी सभापती तथा पंचायत समिती सदस्य अनिलकुमार दसराम बिसेन यांच्याविरुद्ध विभागीय आयुक्त, नागपूर विभाग यांनी अपात्रतेचा निर्णय दिल्यानंतर आता देवरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतींमधील कथित आर्थिक अनियमितता आणि मनरेगा कामांतील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील ५५ ग्रामपंचायतींमध्ये आर्थिक वर्ष २०२०-२१ ते २०२५-२६ या कालावधीत मनरेगा योजनेंतर्गत झालेल्या कथित भ्रष्टाचार व आर्थिक अनियमिततांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणात महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य रोहित राजेंद्र पवार यांनी केलेल्या निवेदनाची विभागीय आयुक्त कार्यालयाने दखल घेतली आहे. विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर (रोहयो शाखा) यांनी २८ ऑक्टोबर २०२६ रोजी गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रातून निवेदनात नमूद मुद्द्यांची सविस्तर चौकशी करून चौकशी अहवाल कार्यालयास सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे देवरी पंचायत समिती अंतर्गत मनरेगा कामांच्या चौकशीचा मार्ग प्रशासकीय स्तरावर पुढे सरकला आहे.
आमदार रोहित पवार यांच्याकडूनही मनरेगा गैरव्यवहाराची दखल घेतली होती,देवरी पंचायत समिती अंतर्गत अनेक ग्रामपंचायतींमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कुशल व अकुशल कामांमध्ये आर्थिक अनियमितता झाल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. या प्रकरणाची गंभीर दखल आमदार रोहित पवार यांनी घेत प्रशासनाला याबाबत अवगत केले होते. तसेच या विषयावर विधानसभेत प्रतिप्रश्न उपस्थित करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.
यासंदर्भात विभागीय आयुक्त, नागपूर यांच्या दालनात बैठक घेऊन संबंधित प्रकरणात हस्तक्षेप करून चौकशीचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रातून ५५ ग्रामपंचायतींमधील आर्थिक वर्ष २०२०-२१ ते २०२५-२६ या कालावधीतील मनरेगा कामांची सविस्तर चौकशी करण्याबाबत कार्यवाही करण्यास सांगितले आहे.
बिसेन यांच्या कार्यकाळातील कामेही चौकशीच्या केंद्रस्थानी?
दरम्यान, पंचायत समितीचे माजी सभापती अनिलकुमार बिसेन यांच्याविरुद्ध भूषण टेकचंद मस्करे यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ च्या कलम १६(१) अंतर्गत दाखल केलेल्या तक्रारीवर विभागीय आयुक्तांनी सुनावणी घेतली होती. ४ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या आदेशात शासकीय जमिनीवरील अतिक्रमण आणि बांधकाम साहित्य पुरवठ्याच्या व्यवहारातील हितसंबंधासंबंधी अभिलेखांवर आधारित निष्कर्ष नोंदविण्यात आले असून, त्यानुसार बिसेन यांना पंचायत समिती सदस्य म्हणून राहण्यास अपात्र ठरविण्यात आल्याची पत्र समोर केले.
या निर्णयानंतर आता त्यांच्या कार्यकाळात पंचायत समिती अंतर्गत झालेल्या विविध विकासकामांची, विशेषतः मनरेगा योजनेंतर्गत झालेल्या कुशल व अकुशल बांधकामांची चौकशी झाल्यास आणखी काही अनियमितता समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विभागीय आयुक्तांनी अनिल बिसेन यांच्या अपात्रतेसंदर्भात दिलेला निर्णय, शासकीय जमिनीवरील अतिक्रमण, बांधकाम साहित्य पुरवठ्यातील कथित हितसंबंध तसेच देवरी पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायतींमध्ये मनरेगा योजनेंतर्गत झालेल्या कथित आर्थिक अनियमितता बाबद कारवाई करण्यात आले आहे .
आमदार रोहित पवार यांच्या निवेदनानंतर विभागीय आयुक्त कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशी अहवाल मागविण्याची कार्यवाही केल्याने या प्रकरणाला आता प्रशासकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. चौकशी केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष कामांची पाहणी, लाभार्थ्यांची पडताळणी, साहित्य खरेदीची बिले, देयके, मोजमाप पुस्तिका आणि संबंधित आर्थिक अभिलेखांची तपासणी करून करण्यात येईल यात शंका नाही.
५५ ग्रामपंचायतींच्या चौकशीतून कोणाचे पितळ उघड होणार?
देवरी पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतींमध्ये गेल्या सहा आर्थिक वर्षांत मनरेगा योजनेंतर्गत झालेल्या कामांची चौकशी झाल्यास अनेक महत्त्वाच्या बाबी समोर येण्याची शक्यता आहे. विशेषतः कामांची प्रत्यक्ष स्थिती, मंजूर अंदाजपत्रके, कुशल व अकुशल खर्च, साहित्य पुरवठा, मजुरांची उपस्थिती, लाभार्थ्यांची निवड आणि प्रत्यक्ष अदा करण्यात आलेली देयके यांची तपासणी महत्त्वाची ठरणार आहे.
विभागीय आयुक्तांच्या पत्रानुसार जिल्हा प्रशासनाकडून होणाऱ्या चौकशीकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या चौकशीत अनियमितता आढळल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार अथवा इतर जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कारवाई होणार का, तसेच शासनाच्या निधीचा अपव्यय झाला असल्यास त्याची वसुली केली जाणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
एकीकडे पंचायत समितीच्या माजी सभापतींच्या अपात्रतेचा निर्णय आणि दुसरीकडे ५५ ग्रामपंचायतींमधील मनरेगा कामांच्या चौकशीचे निर्देश, यामुळे देवरी पंचायत समितीतील मागील काही वर्षांच्या कारभाराची प्रशासकीय तपासणी आता निर्णायक टप्प्यावर पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.





