‘खरी कमाई’तून विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञानाचे धडे
कोयलारी जि. प. प्राथमिक शाळेत ‘दप्तरमुक्त शनिवार’ अंतर्गत भाजीपाला विक्रीचा अभिनव उपक्रम

कोयलारी/ शेंडा २६ सप्टेंबर ( निलेश शहारे ) : शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकातील धडे नव्हे, तर प्रत्यक्ष जीवनातील अनुभवातूनही विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडते, हे अधोरेखित करणारा अनोखा उपक्रम कोयलारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राबविण्यात आला. ‘दप्तरमुक्त शनिवार’ या उपक्रमांतर्गत शनिवार, दि. २६ सप्टेंबर २०२६ रोजी विद्यार्थ्यांसाठी ‘खरी कमाई – भाजीपाला विक्री’ हा अभिनव उपक्रम घेण्यात आला.
या उपक्रमात इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्वतः भाजीपाला विक्रीचा अनुभव घेतला. ग्राहकांशी संवाद साधणे, वस्तूची विक्री करणे, पैशांची देवाणघेवाण करणे आणि व्यवहार सांभाळणे अशा प्रत्यक्ष अनुभवातून विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहाराचे प्राथमिक ज्ञान मिळाले.

मेहनतीचे महत्त्व, स्वावलंबन, आत्मविश्वास आणि व्यवहारकौशल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. प्रत्यक्ष विक्री करताना विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. पुस्तकाबाहेरील या अनुभवात्मक शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील व्यवहार समजून घेण्याची संधी मिळाली.
या उपक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस. एस. मेश्राम, सहाय्यक शिक्षक श्री. डी. एच. राऊत आणि फुंडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
यावेळी भारतीय सैनिक खेमराज पर्वते, हेमु जी. वालदे, विश्वजीत बडोले, सुनीता कोवाचे, यादोराव ब्राह्मणकर, संजय वालदे, तुळशी पर्वते, नरेंद्र वालदे, रमा जनबंधू, शीतल पर्वते, प्रणाली मौदेकर, सुप्रिया वालदे, सखाराम डोंगरवार, विजय कोहळे, शंकर ठाकरे तसेच गावातील महिला व पुरुष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबत प्रत्यक्ष जीवनातील व्यवहाराचे धडे देणारा ‘खरी कमाई’ हा उपक्रम कौतुकाचा विषय ठरला असून, शाळेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आयोजक :
जि. प. प्राथमिक शाळा, कोयलारी





