सौंदडमध्ये डुग्गीपार पोलिसांची धडक कारवाई, एकाला अटक
२ किलो ६३० ग्रॅम गांजा जप्त; १ लाख ३१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

सौंदड २९सप्टेंबर : सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथे डुग्गीपार पोलिसांनी अवैध गांजा विक्रीविरोधात धडक कारवाई करत २ किलो ६३० ग्रॅम गांजा जप्त केला. या कारवाईत विदेश संपत बडोले (वय ३६) याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे २८ सप्टेंबर रोजी रात्री सौंदड येथील शास्त्री वॉर्डातील विदेश बडोले याच्या राहत्या घरावर छापा टाकण्यात आला. पंचांसमक्ष घराची झडती घेतली असता २ किलो ६३० ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. पोलिसांनी हा गांजा जप्त केला असून, त्याची अंदाजे किंमत १ लाख ३१ हजार ५०० रुपये असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील श्रीराम नगर परिसरातील एका हॉटेलच्या आडून गांजा विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची चर्चा परिसरात आहे. मात्र, या चर्चेची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या तपासाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
जप्त करण्यात आलेला गांजा नेमका कुठून आणण्यात आला, त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच या प्रकरणाशी संबंधित इतर व्यक्तींचा काही संबंध आहे का, याचा तपास डुग्गीपार पोलीस करीत आहेत.





