गोंदियासडक अर्जुनी

सडक अर्जुनीत पेपरफुटी विरोधात २४ जुलैला कोहमारा ते तहसील कार्यालयापर्यंत विद्यार्थ्यांचा विराट एल्गार

सडक अर्जुनी, दि. २३ जुलै ( निलेश शहारे ) : देशभरात वारंवार घडणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या गंभीर प्रकाराविरोधात सडक अर्जुनी येथील विद्यार्थ्यांनी थेट संघर्षाचे रणशिंग फुंकले असून, येत्या २४ जुलै २०२६ रोजी दुपारी १.३० वाजता एका भव्य आणि शांततापूर्ण विद्यार्थी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली कोहमारा येथून निघून सडक अर्जुनी तहसील कार्यालयापर्यंत धडकणार आहे. या रॅलीमध्ये तालुक्यातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक, शिक्षक आणि शिक्षणप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे जाहीर आवाहन आयोजकांनी केले आहे.

प्रभावी घोषणांनी वेधणार शासनाचे लक्ष‘पेपरफुटी थांबवा – विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवा’, ‘शिक्षण हा आमचा हक्क आहे, विशेषाधिकार नाही’, ‘पेपरफुटी म्हणजे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची फसवणूक’ आणि ‘भविष्य विक्रीसाठी नाही’ अशा काळजाला भिडणाऱ्या आणि प्रभावी घोषणांनी कोहमारा ते तहसील कार्यालयाचा संपूर्ण मार्ग दणाणून सोडत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या रॅलीतून केला जाणार आहे.

दोषींवर कठोर कारवाईची मागणीया आंदोलनाच्या माध्यमातून सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि संपूर्ण न्याय सुनिश्चित करण्याची आग्रही मागणी केली जाणार आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी आणि कष्टाशी खेळणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमधील मुख्य सूत्रधार व दोषींवर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, ही या रॅलीची प्रमुख मागणी असेल.

सोनम वांगचुक यांच्या भूमिकेला जाहीर पाठिंबाविद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांसाठी सातत्याने देशपातळीवर आवाज उठविणारे विख्यात समाजसेवक व शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी घेतलेल्या भूमिकेला या रॅलीच्या माध्यमातून सडक अर्जुनीतून जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात येणार असल्याचेही आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

एकजुटीचे आवाहन कोहमारा येथून सुरू होणारी ही संपूर्ण रॅली पूर्णपणे शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि लोकशाही मार्गाने तहसील कार्यालयापर्यंत पार पडणार आहे. त्यामुळे सडक अर्जुनी तालुक्यातील प्रत्येक जागरूक नागरिक, पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी आणि शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी या रॅलीत एकत्र येत आपली वज्रमूठ दाखवावी, असे कळकळीचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button