छत्रपती संभाजीनगरमहाराष्ट्रसामाजिक

नशामुक्त आणि बालविवाहमुक्त छत्रपती संभाजीनगरचा निर्धार; जनजागृती पंधरवड्याला उत्साहात प्रारंभ

छत्रपती संभाजीनगर, दि. 13 जुलै 2026 ( प्रतिनिधी ) : जिल्ह्यात नशामुक्त आणि बालविवाहमुक्त समाज घडविण्याच्या उद्देशाने आयोजित “नशामुक्त छत्रपती संभाजीनगर अभियान” तसेच “बालविवाह मुक्त छत्रपती संभाजीनगर पंधरवडा” (13 ते 31 जुलै 2026) याचा शुभारंभ सोमवारी एमआयटी कॉलेजच्या मंथन हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात झाला. जिल्हा परिषद, जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय, नशामुक्त भारत अभियान जिल्हा समिती, पोलीस विभाग, शिक्षण विभाग आणि जय विश्वकर्मा सर्वोदय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या अभियानाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे आणि जिल्हाधिकारी विनय गवडा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. विद्यार्थ्यांनी नशामुक्त भारत आणि बालविवाहमुक्त समाज या विषयांवरील आकर्षक रांगोळ्या साकारून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनू पी. एम. या होत्या. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अभिनव बालुरे, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपआयुक्त डॉ. दीपक खरात, मानसिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. जितेंद्र डोंगरे, उपअधीक्षक साईनाथ ठोंबरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. छाया आवरगावकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षण अधिकारी अश्विनी लाटकर यांनी प्रास्ताविक केले, तर विलास चंदने यांनी नशामुक्ती अभियानाची उद्दिष्टे आणि गरज याविषयी माहिती दिली. यावेळी अभिनव बालुरे यांनी उपस्थितांना नशामुक्तीची शपथ दिली. तसेच प्रमुख मान्यवरांच्या हस्ते “बालविवाह मुक्त छत्रपती संभाजीनगर” या अभियानाच्या लोगोचे विमोचन करण्यात आले. महादेव डोंगरे यांनी बालविवाहमुक्तीची शपथ देऊन समाज परिवर्तनासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

मार्गदर्शन सत्रात अभिनव बालुरे आणि डॉ. जितेंद्र डोंगरे यांनी सादरीकरणाद्वारे अमली पदार्थांचे दुष्परिणाम, मानसिक आरोग्याचे महत्त्व आणि व्यसनमुक्त जीवनशैली यावर सविस्तर मार्गदर्शन केले. गीता बागवडे यांनी बालविवाहाच्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकत जनजागृतीची आवश्यकता अधोरेखित केली. तसेच डॉ. कृष्णा रामचंद्र भावले यांनी व्यसनमुक्ती, समाजसहभाग आणि प्रभावी जनजागृती या विषयांवर प्रेरणादायी विचार मांडले.

कार्यक्रमस्थळी मुक्ताई व्यसनमुक्ती केंद्र, सहारा व्यसनमुक्ती केंद्र आणि नशाबंदी मंडळाच्या वतीने व्यसनमुक्ती विषयक माहितीपर पोस्टर प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांनी आणि उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मान्यवरांचे स्वागत विलास चंदने लिखित “आत्मसंयम” या अमली पदार्थविरोधी ग्रंथाचे वितरण करून करण्यात आले. शेख रशीद रहिमान यांनी मनोगत व्यक्त केले, तर एका व्यसनमुक्त युवकाने स्वतःचा प्रेरणादायी अनुभव कथन करून उपस्थितांना व्यसनापासून दूर राहण्याचा संदेश दिला. जिल्हा समाज कल्याण अधिकारी बाबासाहेब अरवत यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर जय विश्वकर्मा सर्वोदय संस्थेच्या वतीने डॉ. शंखपाळ यांनी विद्यार्थ्यांना प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फड सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीमती लहाने-वाघ यांनी केले.

या अभियानात विविध शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, शिक्षक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. नशामुक्त आणि बालविवाहमुक्त छत्रपती संभाजीनगर घडविण्याचा सामूहिक निर्धार उपस्थितांनी व्यक्त करत जनजागृतीची चळवळ अधिक व्यापक करण्याचा संकल्प केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button