नांदेडमध्ये अंदाज समितीची धडक कारवाई; वाळू माफियांचा भांडाफोड, अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
" उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे व तहसीलदार गजानन शिंदे यांच्यावर तातडीने कारवाईचे आदेश.”

नांदेड प्रतिनिधी ११ एप्रिल : जिल्ह्यातील वाळू घाटांवरील बेकायदेशीर कारभारावर अखेर पडदा उघडला गेला आहे. महाराष्ट्र विधानमंडळाच्या अंदाज समितीने बिलोली तालुक्यातील सगरोळी वाळू घाटावर ९ एप्रिल रोजी अचानक धाड टाकत प्रशासनातील निष्काळजीपणा आणि वाळू माफियांचे संगनमत उघड केले.
या अनपेक्षित भेटीमुळे महसूल आणि स्थानिक प्रशासनाची अक्षरशः तारांबळ उडाली. कागदोपत्री नियमांचे पालन होत असल्याचे दाखवले जात असताना प्रत्यक्षात मात्र मोठ्या प्रमाणावर यंत्रांच्या सहाय्याने वाळू उपसा सुरू असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले.
समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांनी यावेळी संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांना थेट इशारा दिला. “प्रशासनाने मांडलेला सगळा खेळ आता उघड झाला आहे. अधिकारी आणि वाळू माफिया यांच्यातील संगनमत स्पष्ट दिसत आहे,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सुनावले.
यावेळी एसडीएम क्रांती डोंबे आणि तहसीलदार गजानन शिंदे यांच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. “हे सर्व त्यांच्या नाकाखाली सुरू असताना त्यांनी कारवाई का केली नाही?” असा जाब विचारत संबंधितांवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
पाहणीदरम्यान वाळू घाटावर सीसीटीव्ही कॅमेरे नसणे, उपशाची कोणतीही नोंद नसणे आणि नियम धाब्यावर बसवून मशीनद्वारे मोठ्या प्रमाणात वाळू काढली जात असल्याचे उघड झाले. यावरून प्रशासनाचा या बेकायदेशीर कारभाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचा संशय अधिक गडद झाला आहे.
समिती सदस्यांनी घटनास्थळीच अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढत जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली. या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील वाळू माफियांचे धाबे दणाणले असून प्रशासनावर आता ठोस कारवाईचा दबाव वाढला आहे.
एकीकडे वाळू टंचाईचे कारण पुढे केले जात असताना दुसरीकडे खुलेआम यंत्रांच्या साहाय्याने उपसा सुरू असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकारी संबंधित अधिकाऱ्यांवर नेमकी कोणती कारवाई करणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.





