पोस्टे. दवनीवाडा परिसरात रेती चोरीचा पर्दाफाश; लाखोंचा मुद्देमाल जप्त

गोंदिया, ११एप्रिल; दवनीवाडा परिसरात सुरू असलेल्या अवैध रेतिचोरीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपीसह लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्यातील दवनीवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ९ एप्रिल २०२६ रोजी रात्री १०:४५ ते ११:३५ दरम्यान ही घटना घडली. पोलीस पथक गस्त घालत असताना अर्जुनी–फुलगुंडी मार्गावर संशयास्पदरीत्या रेतिने भरलेला ट्रॅक्टर येताना दिसला.
पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाला थांबवण्याचा इशारा केला असता त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तत्परतेने कारवाई करत पोलिसांनी ट्रॅक्टर अडवून तपासणी केली असता, त्यामध्ये अवैधरित्या रेती वाहतूक होत असल्याचे उघड झाले.
या कारवाईत सुमारे ६,०६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये अंदाजे ६,००० रुपयांची रेती आणि ६,००,००० रुपयांचा निळ्या रंगाचा स्वराज कंपनीचा ४८३ एक्सएम मॉडेल ट्रॅक्टर समाविष्ट आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध रेतिचोरी करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलीस प्रशासनाचा इशारा:
“अवैध रेती उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,” असा इशारा दवनीवाडा पोलिसांनी दिला आहे.




