१६ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांसाठी विधान परिषद निवडणूक जाहीर
१८ जूनला मतदान; २२ जूनला मतमोजणी, राज्यात आचारसंहिता लागू

मुंबई वृत्तसेवा १९ मे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या १६ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांसाठी द्वैवार्षिक निवडणूक कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संबंधित मतदारसंघांमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. मतदान १८ जून २०२६ रोजी होणार असून मतमोजणी २२ जून रोजी करण्यात येणार आहे.
या निवडणुका सोलापूर, अहमदनगर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, उस्मानाबाद-लातूर-बीड, परभणी-हिंगोली आणि औरंगाबाद-जालना या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये होणार आहेत.
निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार संबंधित मतदारसंघात किमान ७५ टक्के स्थानिक स्वराज्य संस्था कार्यरत असणे आणि ७५ टक्के मतदार अस्तित्वात असणे आवश्यक असते. यापूर्वी काही मतदारसंघांमध्ये ही अट पूर्ण न झाल्याने निवडणुका रखडल्या होत्या. मात्र आता सर्व आवश्यक अटी पूर्ण झाल्याची माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी आयोगाला दिल्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या तारखा :
अधिसूचना जारी : २५ मे २०२६
अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत : १ जून
अर्ज छाननी : २ जून
अर्ज माघार : ४ जून
मतदान : १८ जून २०२६
मतमोजणी : २२ जून २०२६
मतदान १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत होणार असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया २५ जूनपूर्वी पूर्ण केली जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, ज्या सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे त्यामध्ये प्रशांत परिचारक, अरुणकाका जगताप, रवींद्र फाटक, चंद्रशेखर पाटील, मोहनराव कदम, अमरनाथ राजूरकर, दुश्यंत चतुर्वेदी, अनिल भोसले, डॉ. परिणय फुके, अनिकेत तटकरे, नरेंद्र दरोडे, रामदास आंबटकर, प्रविण पोटे, सुरेश धस, विप्लव बाजोरिया आणि अंबादास दानवे यांचा समावेश आहे.




