ताज्या बातम्यामहाराष्ट्रवृत्तविशेष

विषारी दारू प्रकरणात कुणाला वाचवण्याचा प्रयत्न ? रोहित पवारांचा सवाल;

पोलिसांना मराठी बाणा दाखवत महाराष्ट्राची मान उंचावण्याचे आवाहन

पुणे दि.30 मे (अस्तित्वाचे बोल न्यूज नेटवर्क) ; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पोलिसांना आपला मराठी बाणा दाखवत महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावण्याचे आवाहन केले आहे. पुण्यातील विषारी दारूकांडाचा तपास पुणे पोलिसांच्या मुखियाला जमणार नसल्याचे लक्षात आल्यानेच सरकारवर हल्लाबोल केला.

पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे 18 जणांचा बळी गेला आहे. या प्रकरणी राजकीय वर्तुळात संतप्त पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी राज्य पोलिसांना उपरोक्त आवाहन करत या प्रकरणाच्या सीबीआय तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले, पुण्यातील विषारी दारुकांडाचा तपास पुणे पोलिसांच्या ‘मुखिया’ला जमणार नसल्याचं लक्षात आल्यानेच मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी याचा तपास CID कडे देण्याचा निर्णय घेतल्याचं दिसतंय. CID कडे तपास दिल्यास काय परिस्थिती होते हे अजितदादांच्या विमान अपघाताच्या तपासावरून दिसतंच आहे.

पण किमान चोऱ्यामाऱ्या, पाकिटमारी, चेन स्नॅचिंग अशा प्रकारच्या छोट्या गुन्ह्यांचा तपास CID करेल असं वाटल्यानेच कदाचित त्यांच्याकडे हा तपास दिला असावा किंवा अजितदादांच्या अपघाताप्रमाणे या दारूकांडातही कुणालातरी वाचवण्याचा यामागे काही हेतू नाही ना, हेही तपासण्याची गरज आहे. पण आमचंही हेच मत आहे की, राज्य सरकारने यापुढे पोलीस ठाणे वसुलीसाठी राखीव ठेवून चोऱ्यामाऱ्या, पाकिटमारी, चेन स्नॅचिंग यांसारख्या गुन्ह्यांच्या तपासाचं काम CID कडेच सोपवावं आणि अजितदादांच्या अपघाताचा तपास विधानसभेत दिलेल्या शब्दाप्रमाणे CID कडून काढून CBI कडे द्यावा. यामुळं किमान अजितदादांना तरी न्याय मिळेल.

खरं म्हणजे काही पोलिसांमुळे बहुतांश प्रामाणिक पोलिसांची बदनामी होते, हे कुणी लक्षात घेत नाही. त्यामुळं मराठी माणूस म्हणून मला पोलिसांनाही विचारायचं की, किती दिवस तुम्ही हे असं दबावाखाली काम करणार? कधीतरी मराठी बाणा दाखवून पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलिसांची मान अभिमानाने उंचावेल असं काम करणार की नाही? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button