कोहमारा बंधाऱ्यात अवैध वाळूचा वापर? महसूल विभागावर नागरिकांचा सवाल

गोंदिया | प्रतिनिधी दि.12 मे : सडक अर्जुनी तालुक्यातील कोहमारा परिसरात सुरू असलेल्या बंधारा बांधकामामुळे महसूल विभाग आणि संबंधित यंत्रणा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या या बंधाऱ्यासाठी बिना रॉयल्टीची वाळू वापरण्यात आल्याची जोरदार चर्चा सध्या परिसरात सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शशीकरण नाल्यावर गेल्या काही महिन्यांपासून बंधारा बांधकामाचे काम सुरू आहे. या कामासाठी लागणारी वाळू थेट नाल्याच्या पात्रातूनच मोठ्या प्रमाणात उपसा करण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे, या वाळूसाठी कोणतीही अधिकृत रॉयल्टी भरली गेली नसल्याचे बोलले जात असून त्यामुळे शासनाच्या महसुलालाही फटका बसल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
स्थानिकांच्या मते, दिवसाढवळ्या सुरू असलेल्या या वाळू उपशाकडे महसूल विभागाने दुर्लक्ष केले. तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसील प्रशासनाच्या भूमिकेवर आता प्रश्न उपस्थित होत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असताना संबंधित अधिकाऱ्यांना याची माहिती नव्हती का, असा सवाल नागरिक विचारत आहेत.
दरम्यान, या प्रकरणाची माहिती महसूल विभागाला अनेक वेळा देण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. मात्र त्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने संशय अधिकच वाढला आहे. या संदर्भात तहसीलदारांनी “प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल,” असे सांगितले.
सध्या या संपूर्ण प्रकारामुळे सडक अर्जुनी तालुक्यात खळबळ उडाली असून संबंधित कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.




