गोंदियात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींची औषधे जप्त

गोंदिया, ६ जून २०२६: अन्न व औषध प्रशासनाने गोंदिया शहरातील एका आयुर्वेदिक औषध विक्री केंद्रावर धडक कारवाई करत तब्बल १२,४५८ रुपयांचा औषधसाठा जप्त केला आहे. गंभीर आजारांवर हमखास उपचाराचा दावा करणाऱ्या जाहिरातींमुळे ही कारवाई करण्यात आली असून, संबंधितांवर कायद्यानुसार पुढील कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी गोंदियातील पतंजली मेगा स्टोअर्स, गोरगाव रोड, आर.टी.ओ. कार्यालयाजवळ येथे अचानक तपासणी केली. तपासणीदरम्यान मधुमेह, कॅन्सर आणि लठ्ठपणा यांसारख्या गंभीर आजारांवर परिणामकारक उपचाराचा दावा करणारी काही आयुर्वेदिक उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे आढळून आले.
कारवाईदरम्यान दिव्य महामंजिष्ठादी क्वाथ, दिव्य खदिरारिष्ट, दिव्य शिलाजीत ड्रॉप्स, पतंजली करेला-जामुन ज्यूस आणि दिव्य मेदोहर वटी ही उत्पादने जप्त करण्यात आली. जप्त औषधांची एकूण किंमत १२,४५८ रुपये असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही उत्पादने औषधे व जादूटोणावरील उपचार (आक्षेपार्ह जाहिरात) कायदा, १९५४ मधील तरतुदींचे उल्लंघन करत असल्याचे आढळले. संबंधित जाहिरातींमध्ये वैज्ञानिक पुरावा नसताना गंभीर आजार बरे होण्याचे दावे करण्यात आले होते. अशा प्रकारे जनतेची दिशाभूल करून औषधांची विक्री करणे हा गंभीर गुन्हा मानला जातो.
ही कारवाई राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. औषध निरीक्षक अभिषेक पाटील, सहाय्यक आयुक्त अमिता सपकाळ आणि इतर अधिकाऱ्यांच्या पथकाने ही मोहीम राबविली.
दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही भ्रामक जाहिरातींना बळी पडू नये, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधांचे सेवन करू नये आणि अशा प्रकारच्या तक्रारी त्वरित अन्न व औषध प्रशासनाकडे नोंदवाव्यात, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
“जनतेच्या आरोग्याशी खेळ अजिबात खपवून घेतला जाणार नाही. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि निकृष्ट दर्जाच्या औषधांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहील,” असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.




