भंडारामहाराष्ट्रराजकारण

नामनिर्देशनाआधी काँग्रेसला झटका; लाखांदूरमधील 4 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

साकोली 1 जून प्रतिनिधी : महाराष्ट्रात सध्या 17 जागांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असतानाच, भंडारा-गोंदिया मतदारसंघात काँग्रेसला अत्यंत मोठा आणि अनपेक्षित धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा बालेकिल्ला समजला जाणारा लाखांदूर येथे काँग्रेस 4 नगरसेवक भाजपात.

विधानपरीषद आमदार भाजपा नेते डाँ. परीणय फुके व लाखांदूरचे नगराध्यक्ष विनोद ठाकरे यांनी पडद्यामागे आखलेली ‘चाणक्य नीती’ आणि ‘गनिमी कावा’ या पक्षांतरामागे यशस्वी ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. नाना पटोले यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे, तसेच सलग दुसऱ्यांदा काँग्रेसकडून लाखांदूर नगरपंचायतीवर स्वीकृत नगरसेवक म्हणून वर्णी लागलेले मुकेश उर्फ बंटी सहजानी यांनी थेट राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला. या धक्क्यातून काँग्रेस सावरत नाही तोच, दुसऱ्या दिवशी निशा जगदीश बगमारे, लोभाताई बाळू शिलार आणि लता प्रमोद कुडेगावे या तीन महिला नगरसेविकांनीही विधान परिषद आमदार डॉ. परिणय फुके यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश केला.

अविनाश ब्राह्मणकर विरुद्ध प्रफुल्ल अग्रवाल लढत

भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात यावेळची लढत अत्यंत प्रतिष्ठेची आणि चुरशीची मानली जात आहे. महायुतीकडून भाजपने यंदा अविनाश ब्राह्मणकर यांना रिंगणात उतरवले आहे. ब्राह्मणकर यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत साकोली मतदारसंघात नाना पटोले यांना चिवट झुंज दिली होती, जिथे पटोले यांचा केवळ 208 मतांनी निसटता विजय झाला होता. ब्राह्मणकर यांची हीच वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन पक्षाने त्यांना विधान परिषदेची संधी दिली आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसने प्रफुल्ल अग्रवाल यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. प्रफुल्ल हे गोंदियाचे माजी काँग्रेस आमदार गोपालदास अग्रवाल यांचे सुपुत्र असून, मागील विधान परिषद निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

या मतदारसंघातून यापूर्वी भाजपचे डॉ. परिणय फुके हे विधान परिषद सदस्य होते. हा जिल्हा नाना पटोले यांच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचाही बालेकिल्ला मानला जातो. मात्र, मतदान करणाऱ्या स्थानिक लोकप्रतिनिधींमध्येच आता भाजपने खिंडार पाडल्यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. ऐन मतदानाच्या काही दिवस आधी लाखांदूर नगरपंचायतीमधील काँग्रेसचे हे संख्याबळ घटल्यामुळे, त्याचा थेट फटका काँग्रेस उमेदवार प्रफुल्ल अग्रवाल यांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाना पटोलेंच्या स्वतःच्या मतदारसंघात लागलेला हा सुरुंग आगामी निवडणुकीचा निकाल बदलणारा ठरणार का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button