महाराष्ट्रवृत्तविशेष

राज्यात 10 जूनपर्यंत मान्सूनची प्रतिक्षाच; 1 जूनपासून वादळी पावसाचा अंदाज

मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

नागपूर 31 मे : राज्यातील कडाक्याच्या उन्हापासून हैराण झालेल्या नागरिकांना पावसाची प्रतीक्षा लागून राहिली असली, तरी मान्सूनच्या आगमनाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्यातील बहुतांश भागात किमान १० जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे

सध्या राज्यातील हवामान बदलण्यास सुरुवात झाली असून येत्या आठवड्यात त्याचे परिणाम अधिक स्पष्टपणे जाणवतील. प्रामुख्याने खानदेश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. कोकण किनारपट्टीवरही पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

या पावसाळसदृश वातावरणामुळे मे महिन्याच्या तुलनेत राज्याच्या कमाल तापमानात काही प्रमाणात घट होऊन नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळेल. असे असले तरी, पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पारा अद्यापही ४० अंश सेल्सिअसच्या वरच राहण्याची शक्यता आहे.

मान्सून अद्याप केरळातच; पेरणीबाबत खबरदारी

हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की, आगामी काळात होणारा वादळी पाऊस हा मान्सूनचा पाऊस नाही. मान्सून अद्याप केरळमध्ये पोहोचलेला नसल्यामुळे महाराष्ट्रात त्याचे आगमन लांबणीवर पडले आहे. या पार्श्वभूमीवर, कृषी विभागाने शेतकऱ्यांना अत्यंत मोलाचा सल्ला दिला आहे. मान्सूनपूर्व पडणाऱ्या वादळी पावसावर अवलंबून राहून शेतकऱ्यांनी पेरणीची अजिबात घाई करू नये. पुरेशा पावसाअभावी पेरणी केल्यास बियाणे वाया जाण्याची भीती असल्याने, मान्सूनचे अधिकृत आगमन आणि जमिनीतील ओलावा पाहूनच पेरणीचा निर्णय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांसाठी सुरक्षिततेच्या सूचना

कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांकडून शेतकऱ्यांना आणि लोकांना आवाहन करण्यात येत आहे की, संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी. शेतकऱ्यांनी वादळी पावसावर अवलंबून राहून आणि मान्सूनचे आगमन होण्यापूर्वी पेरणीची घाई करू नये. विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी झाडांखाली, टीनशेडखाली किंवा मोकळ्या जागेत उभे राहणे टाळावे. विद्युत ट्रान्सफॉर्मर, विजेचे खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहू नये. शेतकऱ्यांनी आपल्या पाळीव जनावरांना सुरक्षित जागी बांधावे, जेणेकरून वीज पडण्यासारख्या दुर्घटनांपासून त्यांचा बचाव करता येईल. हवामानातील हे बदल तात्पुरत्या स्वरूपाचे असले तरी, १० जूनपर्यंत मान्सूनची अधिकृत प्रतीक्षा कायम राहणार असल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button