गोंदियाचोरीमहाराष्ट्र

तहसील कार्यालयातूनच डंपरच्या बॅटऱ्या चोरी

शासकीय आवारातील सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह!

गोंदिया १४ मे २०२६ : सडक अर्जुनी तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या आवारातूनच डंपरच्या दोन महागड्या बॅटऱ्या चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, शासकीय कार्यालय परिसरातच ही चोरी झाल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत असून तहसील कार्यालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश देवदास कावळे यांच्या मालकीचा एमएच 35 एजे 6767 क्रमांकाचा मालवाहू डंपर महसूल विभागाने अवैध रेती वाहतुकीच्या प्रकरणात जप्त करून तहसील कार्यालय परिसरात उभा केला होता. संबंधित वाहन ३ मे २०२६ पासून तहसील कार्यालयाच्या आवारात ठेवण्यात आले होते.

दरम्यान, वाहनाचा दंड भरण्यासाठी सुरेश कावळे हे बुधवारी (१३ मे) तहसील कार्यालयात आले असता त्यांनी वाहनाची पाहणी केली. त्यावेळी डंपरमधील अंदाजे ४५ हजार रुपये किमतीच्या दोन मोठ्या बॅटऱ्या अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हा प्रकार लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली.

यानंतर वाहन मालकाने तहसीलदारांना याबाबत माहिती दिली असता, पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला. तसेच तहसील प्रशासनाकडूनही स्वतंत्र तक्रार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणी डूग्गीपार पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तहसील कार्यालय परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असल्याची माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे, शासकीय कार्यालयाच्या आवारात रात्री सुरक्षारक्षक आणि सीसीटीव्ही व्यवस्था असतानाही चोरी कशी झाली, असा सवाल वाहन मालकासह नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे तहसील कार्यालय परिसरातील सुरक्षेची पोलखोल झाल्याची चर्चा सुरू आहे.

या घटनेनंतर तहसील कार्यालय परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button