सडक अर्जुनी नगरपंचायत वॉर्ड क्र. ११ पोटनिवडणुकीचा बिगुल वाजला
वॉर्ड क्रमांक ११ च्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू

गोंदिया दि.१८ मे २६ : सडक अर्जुनी नगरपंचायत अंतर्गत वॉर्ड क्रमांक ११ साठी होणाऱ्या पोटनिवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, निवडणूक प्रक्रियेला आता वेग आला आहे. प्रशासनाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार येत्या काही दिवसांत राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी ६ मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूक कार्यक्रम १२ मे २०२६ रोजी जाहीर करण्यात आला आहे. उमेदवारांसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया १८ मे ते २५ मे २०२६ या कालावधीत सुरू राहणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे.
नामनिर्देशन पत्रांची छाननी २६ मे रोजी होणार असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत २८ मे २०२६ निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर अधिकृत उमेदवारांची यादी आणि निवडणूक चिन्हांचे वाटप जाहीर होणार आहे.
या पोटनिवडणुकीसाठी मतदानाची तारीख २० जून २०२६ निश्चित करण्यात आली असून, सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर २१ जून २०२६ रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
वॉर्ड क्रमांक ११ मधील ही पोटनिवडणूक स्थानिक राजकारणासाठी महत्त्वाची मानली जात असून, विविध राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांमध्येही चुरस निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांचे लक्ष आता उमेदवार कोण असतील आणि प्रचाराची दिशा काय असेल याकडे लागले आहे.



