गोंदियासामाजिक

अर्जुनी/मोरगावच्या रेल्वे प्रश्नांवर खासदार प्रफुल्ल पटेल यांना निवेदन

बिलासपूर–चेन्नई एक्सप्रेसचा थांबा पूर्ववत करण्याची मागणी; लोकल गाड्यांच्या अनियमित वेळापत्रकाचा मुद्दाही ऐरणीवर

अर्जुनी/मोरगाव 21 सप्टेंबर 26 : तालुक्यातील रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्यांकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधांशु मेहता यांनी रामनगर, गोंदिया येथे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी भेट देऊन निवेदन सादर केले. यावेळी खासदार राजेंद्र जैन यांचीही उपस्थिती होती.

निवेदनातील प्रमुख मागणी म्हणजे गाडी क्रमांक १२८५१ बिलासपूर–चेन्नई एक्सप्रेसचा अर्जुनी/मोरगाव रेल्वे स्थानकावरील थांबा पूर्ववत करणे. कोरोना महामारीपूर्वी या एक्सप्रेसला अर्जुनी/मोरगाव येथे थांबा होता. मात्र, कोरोना कालावधीनंतर हा थांबा बंद झाल्याने परिसरातील प्रवाशांना गोंदिया किंवा वडसा येथे जाऊन रेल्वे पकडावी लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

अर्जुनी/मोरगाव परिसरातून छत्तीसगडसह विविध भागांत प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या एक्सप्रेसला पुन्हा अर्जुनी/मोरगाव येथे थांबा मिळाल्यास प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होण्यास मदत होईल, असे मेहता यांनी सांगितले.

याशिवाय गोंदिया–बल्लारशाह रेल्वे मार्गावरील लोकल गाड्यांच्या अनियमित वेळापत्रकाचा प्रश्नही निवेदनातून मांडण्यात आला. गाडी क्रमांक ६८८०३, ६८८०५, ६८८०१ आणि ६८८१५ या गाड्या निर्धारित वेळेनुसार नियमित धावत नसल्याने नोकरी, व्यवसाय व रोजगारासाठी दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

या गाड्यांचे वेळापत्रक नियमित करून प्रवाशांना वेळेवर आणि सुरळीत रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

निवेदन स्वीकारल्यानंतर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी संबंधित रेल्वे प्रशासनाकडे या प्रश्नांचा पाठपुरावा करून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे सुधांशु मेहता यांनी सांगितले. अर्जुनी/मोरगाव परिसरातील प्रवाशांच्या दैनंदिन अडचणी लक्षात घेऊन रेल्वेच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, अर्जुनी/मोरगाव येथील एक्सप्रेसचा थांबा पूर्ववत होण्यासह लोकल गाड्यांचे वेळापत्रक सुरळीत करण्याच्या मागणीमुळे आता रेल्वे प्रशासनाच्या भूमिकेकडे परिसरातील प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

यावेळी सुधांशु मेहता यांनी खासदार प्रफुल्ल पटेल व खासदार राजेंद्र जैन यांचे निवेदन स्वीकारून रेल्वे प्रश्नांच्या पाठपुराव्याबद्दल आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button