धावत्या ओम्नीचा दरवाजा उघडला; चिमुकले महामार्गावर कोसळले
खजरी येथे शाळकरी विद्यार्थ्यांचा थरारक प्रसंग; ग्रामस्थांच्या तत्परतेने अनर्थ टळला

सडक अर्जुनी (गोंदिया), दि. १९ सप्टेंबर : तालुक्यातील खजरी येथे शुक्रवार, दि. १८ सप्टेंबर रोजी शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या ओम्नी वाहनाचा मागील दरवाजा अचानक उघडल्याने काही चिमुकले धावत्या वाहनातून राज्य महामार्गावर कोसळले. या घटनेत एका विद्यार्थ्याच्या डोक्याला दुखापत झाल्याची माहिती आहे.
खजरी येथील ‘लिटिल एंजल पब्लिक स्कूल’मधील विद्यार्थ्यांना ओम्नी वाहन क्रमांक एमएच ३५ ई १८०८ मधून घरी सोडण्यात येत होते. गोंदिया-कोहमारा मार्गावरील राज्य महामार्ग क्रमांक ७५३ वर वाहन जात असताना अचानक मागील दरवाजा उघडला आणि काही विद्यार्थी रस्त्यावर पडले.
घटना लक्षात येताच ग्रामस्थांनी धाव घेत विद्यार्थ्यांना सुरक्षित बाजूला केले. त्यानंतर डुग्गीपार पोलिसांना माहिती देण्यात आली असून, पोलिसांनी संबंधित वाहन ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, या घटनेनंतर शाळेची मान्यता, विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनाची फिटनेस व परवाना, चालकाची पात्रता आदींबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. या सर्व बाबींची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस प्रशासन, RTO आणि शिक्षण विभागाने तालुक्यातील शालेय वाहनांची विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी पालक व ग्रामस्थांनी केली आहे.





