अपराधगोंदियासडक अर्जुनी

दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर डुग्गीपार पोलिसांचा दणका

कोहमारा परिसरात दोन चालकांवर कारवाई; ब्रेथ ॲनालायझरमध्ये मद्यप्राशनाचे प्रमाण आढळले

डुग्गीपार 21 सप्टेंबर 20 : मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकांविरोधात डुग्गीपार पोलिसांनी कारवाई केली आहे. कोहमारा परिसरात वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन चालकांकडून वाहन चालविताना मद्यप्राशन केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी दोघांविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिल्या घटनेत विनोद सुरजलाल सलामे (वय ४०, रा. बाह्मणी खडकी, ता. अर्जुनी/स., जि. गोंदिया) हा १९ सप्टेंबर रोजी रात्री कोहमारा ते गोंदिया मार्गावर वाहन चालविताना आढळून आला. पोलिसांनी त्याची तपासणी केली असता अल्कोहोलचे प्रमाण मशीन मध्ये १८०.०९ मिलीग्रॅम/१०० मिली इतके मद्यप्राशनाचे प्रमाण आढळले. यानंतर त्याच्याविरुद्ध कलम १८५ मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसऱ्या घटनेत प्रदीप परसराम हेमने (वय ३२, रा. सौदड, ता. अर्जुनी/स., जि. गोंदिया) हा २० सप्टेंबर रोजी रात्री कोहमारा परिसरात दुचाकी चालविताना आढळला. तपासणीदरम्यान त्याच्या ब्रेथ ॲनालायझर चाचणीत ९२.०४ मिलीग्रॅम/१०० मिली इतके मद्यप्राशनाचे प्रमाण आढळले. त्याच्याविरुद्धही कलम १८५ मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई डुग्गीपार पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास अधिकारी पोलीस हवालदार घनश्याम उईके व दाखल अधिकारी पोलीस हवालदार योगेश कुळमते यांनी पुढील कार्यवाही केली.

मद्यप्राशन करून वाहन चालविणे स्वतःसह इतरांच्या जीवितासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे वाहनचालकांनी मद्यप्राशन करून वाहन न चालविण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button