क्राईमगोंदियामहाराष्ट्र

कत्तलीसाठी कोंबलेल्या ४२ गोवंश जनावरांची सुटका!

दोन कंटेनरमधून निर्दय वाहतूक; १३ आरोपींविरुद्ध गुन्हा, ५१.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त

गोंदिया, दि. ३१ ऑगस्ट २०२६ : कत्तलीच्या उद्देशाने गोवंश जनावरांना क्षमतेपेक्षा जास्त दाटीवाटीने कोंबून निर्दयपणे वाहतूक करणाऱ्या टोळीवर गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई केली. सालेकसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दलदलकुही ते धनेगाव मार्गावर नाकाबंदी करून दोन कंटेनर ट्रक पकडण्यात आले. या दोन्ही वाहनांमधून तब्बल ४२ गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली असून, जनावरांसह दोन कंटेनर ट्रक व चार मोबाईल असा एकूण ५१ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात कारवाईसाठी पेट्रोलिंग करीत असताना सालेकसा परिसरातील दलदलकुही येथून दोन कंटेनर ट्रकमध्ये गोवंश जनावरांना कोंबून कत्तलीसाठी नेण्यात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खात्री करून पोलिसांनी दलदलकुही ते धनेगाव मार्गावर नाकाबंदी केली.

काही वेळातच संशयित दोन कंटेनर ट्रक पोलिसांच्या नजरेस पडले. दोन्ही वाहने थांबवून चालक व लेबर यांना खाली उतरवून कंटेनरची तपासणी केली असता पोलिसांनाही धक्का बसला. एका कंटेनरमध्ये २५ तर दुसऱ्या कंटेनरमध्ये १७, अशी एकूण ४२ गोवंश जनावरे अत्यंत दाटीवाटीने कोंबून व क्रूरतेने बांधून ठेवण्यात आली होती.

पोलिसांनी सर्व ४२ जनावरांची सुटका केली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये ६ लाख ३० हजार रुपये किमतीची ४२ गोवंश जनावरे, ४५ लाख रुपये किमतीचे दोन कंटेनर ट्रक आणि ५७ हजार रुपये किमतीचे चार अँड्रॉइड मोबाईल, असा एकूण ५१ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल आहे.

चालकांची चौकशी केली असता, दलदलकुही परिसरातून गोवंश जनावरे खरेदी करून ती कत्तलीसाठी नागपूर येथील कळमना परिसरात पोहोचविण्याची माहिती समोर आली. या प्रकरणात वाहनमालक, चालक, लेबर तसेच अन्य संबंधित व्यक्तींचा सहभाग असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले.

जनावरांची क्षमतेपेक्षा जास्त व निर्दयपणे वाहतूक करता यावी, यासाठी कंटेनरमध्ये विशेष बदल करण्यात आल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले. कंटेनरच्या मागील बाजूस लोखंडी पाटी, कॅबिनमधून कंटेनरमध्ये जाण्यासाठी दरवाजा तसेच हवा खेळती राहण्यासाठी वरच्या बाजूस खिडकी तयार करण्यात आली होती.

या प्रकरणी १३ आरोपींविरुद्ध प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंधक कायदा १९६० तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ मधील संबंधित कलमांनुसार सालेकसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या निर्देशानुसार पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अभिषेक जंगमवार, पोहवा तुलसीदास लुटे, पोहवा राजकुमार खोटेले, पोहवा दुर्गेश तिवारी, पोहवा प्रकाश गायधने, पोशि सुनील डहाके, पोशि हंसराज भांडारकर, चापोशि निलेश ठाकरे व राम खंदारे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button