महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदियाच्या वतीने बाबासाहेबांची जयंती उत्साहात साजरी

गोंदिया १४ एप्रिल : सडक अर्जुनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, जिल्हा गोंदिया यांच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
जिल्ह्यातील सर्व तालुका शाखांनी या निमित्ताने समाजाभिमुख उपक्रम राबवून बाबासाहेबांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले. ठिकठिकाणी अल्पोपहार, मठ्ठा व सरबत वितरण करण्यात आले, तर रुग्णालयांमध्ये रुग्णांना फळे व टरबूज वाटप करून मानवतेचा संदेश देण्यात आला. या उपक्रमांमुळे जयंती साजरी करण्याला एक सामाजिक दिशा मिळाली.
या कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व तालुका अध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य व पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. संघटनेच्या एकजुटीचे आणि सेवाभावी वृत्तीचे यावेळी उत्कृष्ट दर्शन घडले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, जिल्हा गोंदिया ही केवळ शिक्षकांच्या हक्कांसाठीच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी जपण्यासाठीही सातत्याने अग्रेसर राहिली आहे. त्यामुळेच ही संघटना शिक्षकांच्या मनातील विश्वासार्ह संघटना म्हणून जिल्ह्यात विशेष ओळख निर्माण करत आहे.
अशी माहिती जिल्हाध्यक्ष किशोर बावनकर यांनी दिली.




