महाराष्ट्रमुंबईवृत्तविशेष

26/11 चा दहशतवादी हल्ला भारताच्या सार्वभौमत्वावर आणि संविधानावर आघात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शहीद जवान, पोलीस अधिकारी आणि निरपराध नागरिकांना श्रद्धांजली; करकरे, कामटे, साळसकर, उन्नीकृष्णन आणि ओंबळेंच्या शौर्याला सलाम

मुंबई 26 नोव्हेंबर 2026 : 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला हा केवळ मुंबईतील ताज हॉटेल, ट्रायडेंट हॉटेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणांवरील हल्ला नव्हता, तर तो भारताच्या सार्वभौमत्वावर आणि संविधानावर केलेला थेट आघात होता. या हल्ल्याला भारतीय जवान आणि मुंबई पोलिसांनी आपल्या अतुलनीय शौर्याने चोख प्रत्युत्तर दिले. देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांचे बलिदान देश कधीही विसरणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान, पोलीस अधिकारी आणि निरपराध नागरिक, तसेच पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवान व नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाला उषा पेडणेकर, राहुल दुबाळे यांच्यासह पोलीस परिवारातील माता-भगिनी, पोलीस कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, 26 नोव्हेंबर हा दिवस दोन महत्त्वाच्या घटनांमुळे देशाच्या इतिहासात विशेष स्थान राखतो. आजचा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जगातील सर्वोत्तम संविधान दिले. 26 जानेवारी 1950 रोजी आपण हे संविधान स्वीकारले. भारतीय संविधानाची मूल्ये आणि लोकशाही व्यवस्था सदैव अबाधित राहावी, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

मात्र, याच दिवशी 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची वेदनादायी आठवणही देशाला होते. दहशतवाद्यांनी जाणीवपूर्वक अशा ठिकाणांना लक्ष्य केले होते, जिथे देश-विदेशातील नागरिकांची मोठी वर्दळ असते. ताज आणि ट्रायडेंटसारख्या हॉटेलांना लक्ष्य करून भारताच्या सामर्थ्याला आव्हान देण्याचा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशत निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. हा हल्ला भारताच्या सार्वभौमत्वाला दिलेले आव्हान होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी 26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर तसेच एनएसजीचे मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या शौर्याचे स्मरण करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. पोलीस शिपाई तुकाराम ओंबळे यांच्या धाडसाचा विशेष उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, दहशतवादी अजमल कसाब याच्याकडे आधुनिक शस्त्र होते, तर ओंबळे यांच्याकडे केवळ दंडुका होता. तरीही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी कसाबला पकडण्यासाठी अदम्य साहस दाखवले. गंभीर परिस्थितीतही त्यांनी कसाबला जिवंत पकडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

कसाब जिवंत पकडला गेल्यामुळे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचे पुरावे संपूर्ण जगासमोर आणणे शक्य झाले. त्यामुळे तुकाराम ओंबळे यांचे बलिदान आणि शौर्य हे भारतीय इतिहासात सदैव प्रेरणादायी राहील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

देशाच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावताना प्राण अर्पण करणाऱ्या प्रत्येक जवानाचा, पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्याचा आणि निरपराध नागरिकाचा त्याग अमूल्य आहे. त्यांच्या शौर्याचे स्मरण करणे आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे, असा संदेश या श्रद्धांजली कार्यक्रमातून देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button