भरधाव अवजड वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू
भंडारा–लाखनी राष्ट्रीय महामार्गावर घटना; अज्ञात वाहनाचा शोध सुरू

लाखनी 23 सप्टेंबर, प्रतिनिधी ( राहुल ब्राह्मणकर ) : भंडारा–लाखनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर मंगळवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास भरधाव अज्ञात अवजड वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात वाघिणीचा जागीच मृत्यू झाला. अपघातग्रस्त वन्यजीव वाघ नसून वाघीण असल्याची माहिती वन विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लाखनी परिसरातील अशोक लेलँड कंपनीसमोरून वाघीण महामार्ग ओलांडत होती. त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात अवजड वाहनाने तिला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की वाघीण गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच मृत्युमुखी पडली.
अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहनांची मोठी गर्दी झाली. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होऊन वाहनांच्या रांगा लागल्या. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. महामार्ग पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत रस्ता मोकळा करून वाहतूक सुरळीत केली.
दरम्यान, वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी पंचनामा करून मृत वाघिणीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. धडक देऊन पसार झालेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA)च्या नियमावलीनुसार पुढील कायदेशीर प्रक्रिया वन विभागाकडून राबविण्यात येत आहे.





