
भंडारा प्रतिनिधी ( राहुल ब्राह्मणकर ) : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान विनापरवाना आणि कर्कश आवाजात डीजे वाजवून ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तिघांविरुद्ध साकोली पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली. ही घटना १९ सप्टेंबर रोजी साकोली येथील करंजेकर कॉलेज, जमनापूर रोड परिसरात घडली.
गणेश विसर्जनाचा कार्यक्रम सुरू असताना टाटा ४०७ मालवाहू वाहन क्रमांक MH-29-T-4262 वर डीजे लावून मोठ्या आवाजात ध्वनीक्षेपक सुरू असल्याचे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी डीजेचा आवाज कमी करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. मात्र, संबंधितांनी त्याकडे दुर्लक्ष करून कर्कश आवाजात डीजे सुरूच ठेवला.
पोलिसांनी डीजे वाजविण्याची आवश्यक परवानगी आहे का, याबाबत विचारणा केली असता कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याचे समोर आले. त्यामुळे सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा पोहोचवल्याप्रकरणी पोलिसांनी संबंधितांवर कारवाई केली.
या प्रकरणी डीजे मालक सुनील गोपाल भुरे (३५, रा. लाखनी), डीजे ऑपरेटर प्रतीक मिलिंद कांबळे (३१, रा. केसलवाडा/वाघ) आणि वाहन चालक आशिष संजय पंधरे (३२, रा. लाखनी) यांच्याविरुद्ध साकोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेचे कलम २२३, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेशोत्सव आणि विसर्जन काळात नागरिकांनी ध्वनीप्रदूषणासंदर्भातील नियमांचे पालन करावे, विनापरवाना डीजेचा वापर टाळावा आणि सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन साकोली पोलिसांनी केले आहे.


