नवेगाव बांध येथे पर्यटनाचा नवा अध्याय — नौकाविहार सेवेला प्रारंभ
खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते शुभारंभ

अर्जुनी मोर/नवेगावबांध ८ एप्रिल२६ : गोंदिया जिल्ह्याच्या हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत वसलेले रमणीय पर्यटनस्थळ नवेगाव बांध आज एका नव्या उत्साहाने उजळून निघाले. पर्यटकांच्या अनुभवाला अधिक रंगतदार बनवणाऱ्या आधुनिक नौकाविहार सेवेला आज भव्य शुभारंभ झाला. या सोहळ्याचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात संपन्न झाले.
या ऐतिहासिक क्षणाला आमदार राजकुमार बडोले, जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, S.K. Infra चे सुनील तरोने, तसेच अनेक मान्यवर, अधिकारी, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
निसर्गसौंदर्याने नटलेले नवेगाव बांध हे आधीच पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. आता या ठिकाणी सुरू झालेली नौकाविहार सेवा म्हणजे जणू या सौंदर्यावर सोन्याची कळसच! शांत पाण्यावरून नौकाविहार करताना पर्यटकांना निसर्गाचा अनोखा आणि अविस्मरणीय अनुभव घेता येणार आहे.

उद्घाटनप्रसंगी खासदार प्रफुल पटेल म्हणाले, “नवेगाव बांध हे केवळ पर्यटनस्थळ नाही, तर निसर्गाचा अमूल्य ठेवा आहे. येथे अशा आधुनिक सुविधा निर्माण झाल्याने पर्यटनाला नवे आयाम मिळतील. भविष्यात या ठिकाणाचा सर्वांगीण विकास करून राज्य आणि देशाच्या पर्यटन नकाशावर ठळक स्थान निर्माण करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.”
आमदार राजकुमार बडोले यांनीही भावना व्यक्त करत सांगितले, “आजचा दिवस नवेगाव बांधसाठी अभिमानाचा आहे. नौकाविहाराच्या या उपक्रमामुळे या ठिकाणाला नवी ओळख मिळेल आणि देशभरातून पर्यटक येथे आकर्षित होतील. यामुळे स्थानिक लघु व्यावसायिक, दुकानदार आणि युवकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक संधी उपलब्ध होतील.”
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या प्रेरणादायी भाषणांनी वातावरण भारावून गेले. त्यानंतर नौकाविहार सेवेची प्रत्यक्ष सुरुवात होताच उपस्थित पर्यटकांनी टाळ्यांच्या गजरात या उपक्रमाचे स्वागत केले.
नवेगाव बांधात सुरू झालेली ही नौकाविहार सेवा केवळ एक सुविधा नसून, पर्यटन विकासाचा नवा दीपस्तंभ ठरणार आहे. या उपक्रमामुळे परिसरातील पर्यटनाला नवी झळाळी मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेला मजबूत आधार मिळेल, अशी आशादायी अपेक्षा व्यक्त होत आहे.





