ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारण

धाराशिवच्या राजकारणात ‘यू-टर्न’; ठाकरे गटाचे चार नगरसेवक शिंदेसेनेत

नगरसेवकांच्या पक्षांतराने धाराशिवचे राजकारण ढवळून निघाले

धाराशिव 28 ऑगस्ट 26 : शहराच्या राजकारणात नगरसेवकांच्या पक्षांतरावरून मोठा राजकीय भूकंप झाला आहे. उद्धव ठाकरे गटाच्या नगरसेवकांना आपल्या गोटात खेचण्यासाठी महायुतीमधील भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातच तीव्र चढाओढ पाहायला मिळत आहे.

इंदापुरातून नगरसेवकांचा ‘यू-टर्न’; असा घडला राजकीय ड्रामा

ठाकरे गटाच्या नगरसेवकांना भाजपमध्ये आणण्यासाठी हालचाली सुरू होत्या. मल्हार पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथक या नगरसेवकांना घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले होते. हे पथक पुणे जिल्ह्यातील इंदापूरपर्यंत पोहोचले असता नगरसेवकांनी अचानक यू-टर्न घेतला आणि ते मुंबईऐवजी पुन्हा धाराशिवला परतले. धाराशिवला परतल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सूत्रे हाती घेत या नगरसेवकांना थेट ठाण्यात नेले. तेथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धाराशिव नगर परिषदेच्या नगरसेवकांचा शिवसेनेत पक्षप्रवेश पार पडला.

चार नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश

उपलब्ध माहितीनुसार, धाराशिव नगर परिषदेतील उद्धव ठाकरे गटाच्या चार नगरसेवकांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर स्थानिक पातळीवर ठाकरे गटाला आणखी एक राजकीय धक्का बसला आहे. ओमराजे निंबाळकर यांनी स्वतः काही काळापूर्वी उद्धव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्येही पक्षांतराचे सत्र सुरू झाले. आता नगरसेवकांच्या प्रवेशामुळे हे राजकीय समीकरण आणखी बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कळंबनंतर धाराशिवमध्येही भाजपचा प्रयत्न?

धाराशिव जिल्ह्यातील कळंब नगर परिषदेत उद्धव ठाकरे गटातील दहा नगरसेवक यापूर्वीच भाजपमध्ये दाखल झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे धाराशिव शहरातील नगरसेवकांनाही भाजपच्या गोटात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर धाराशिव शहरातील नगरसेवकांचे पक्षांतर हा भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेमधील स्थानिक राजकीय वर्चस्वाचा भाग असल्याचे मानले जात आहे. भाजपच्या दिशेने निघालेले नगरसेवक अखेर शिंदेसेनेत गेल्याने धाराशिवच्या स्थानिक राजकारणात कोणाचा प्रभाव वाढणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, या पक्षांतरामागे मोठ्या आर्थिक व्यवहाराची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू असल्याचेही दावे केले जात आहेत. नगरसेवकांना कोट्यवधी रुपयांची बोली लावून फोडण्यात येत असल्याची कुजबुज असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या कथित आर्थिक व्यवहाराबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.

पक्षांतरानंतर मतदारांचा संताप; ‘एक कोटींचा गद्दार, आमचे मत परत द्या!’

नगरसेवकांच्या पक्षांतरानंतर धाराशिवमध्ये या राजकीय घडामोडीला वेगळे वळण मिळाले आहे. काही नगरसेवकांच्या परिसरातच त्यांच्या विरोधात बॅनर लावण्यात आले आहेत. धाराशिव शहरातील समता कॉलनी परिसरात नगरसेवक संतोष घाडगे यांच्या घरासमोर संतप्त आशयाचे बॅनर झळकले. त्यामध्ये ‘एक खोका, मतदाराला धोका’, ‘आमचे मत आम्हाला परत द्या’, ‘हा शिक्का पुसला जाणार नाही’, ‘एक कोटींचा गद्दार’ अशा स्वरूपाचा मजकूर असल्याचे समोर आले आहे. या बॅनरमधून पक्षांतर केलेल्या नगरसेवकांविरोधात मतदारांमध्ये नाराजी असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ज्या मतदारांनी निवडून दिले, त्यांच्याच परिसरात नगरसेवकाविरोधात अशा प्रकारची बॅनरबाजी झाल्याने पक्षांतराच्या राजकारणावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र, हे बॅनर नेमके कोणी लावले, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

धाराशिव शहरातील समता कॉलनी परिसरात नगरसेवक संतोष घाडगे यांच्या घरासमोर संतप्त आशयाचे बॅनर झळकले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button